Advertisement

गडचिरोलीतील प्रसिद्ध अधिवक्ता बोधीजी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार

 



गडचिरोलीतील प्रसिद्ध अधिवक्ता बोधीजी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार

वंचित, शोषित, बहुजन आणि आदिवासी जनसामान्यांशी नाळ जोडलेले जागतिक ख्यातीचे कायदे तज्ज्ञ ॲड. बोधी रामटेके

गडचिरोली | प्रतिनिधी - सुखसागर एम. झाडे

गडचिरोली जिल्ह्यातील शोषित, वंचित, बहुजन आणि आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देणारे समाजाभिमुख योद्धा व जागतिक स्तरावर ख्यातीप्राप्त वकील ॲड. बोधीजी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम गडचिरोलीतील हॉटेल वैभव येथे पार पडला.

पुण्यात कायद्याचे शिक्षण पूर्ण करून तसेच स्वीडन, स्पेन आणि लंडन येथे फेलोशिपद्वारे उच्च शिक्षण घेतल्यानंतर बोधीजी यांनी आपल्या मातृभूमीत परत येत वंचित समाजासाठी न्यायाच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. बालपणापासूनच सामाजिक जाण आणि प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. देश-विदेशातील कायद्याचे सखोल ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर त्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात भ्रमंती करून आदिवासी समाजाच्या वास्तव परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.

आदिवासी समाजाचे रस्ता, पूल, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत हक्कांच्या प्रश्नांवर त्यांनी न्यायालयीन पातळीवर लढा दिला. वेंगणूर, सुरगाव, गरंजी आणि पुल्लीगुडमसारख्या दुर्गम गावातील नागरिकांना मतदानासाठी नावेतून प्रवास करावा लागत असल्याच्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले. पाथ फाउंडेशनच्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून आकडेवारी गोळा केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात पत्राद्वारे मुद्दा मांडला. न्यायालयाने त्याला याचिकेचे स्वरूप देत सरकारला नोटीस बजावली आणि सहा महिन्यांत रस्ते व पूल बांधण्याचे आदेश दिले. या ऐतिहासिक संघर्षामुळे दुर्गम भागात विकासाची नवी दारे खुली झाली.

गडचिरोलीतील अवैध जंगलतोड, रस्ते-पूलांची दुरवस्था आणि मानवी हक्कांचे उल्लंघन अशा अनेक गंभीर विषयांवरही ॲड. रामटेके यांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र वृत्तवाहिनीने केलेल्या सातत्यपूर्ण वृत्तांकनाबद्दल ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.

या प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश आणि गडचिरोली जिल्हा शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ॲड. बोधीजी रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास त्यांच्या आई-वडिलांसह (प्राचार्य श्याम रामटेके) मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मडावी, प्रमोद आसूडकर यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या