✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मूल (ता.प्र.): गेल्या सात वर्षांपासून रखडलेला आणि अनेक अपघातांचे केंद्र ठरलेला मूल-चंद्रपूर महामार्ग अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला तत्काळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
गडचिरोली ते मूलपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यात आलेला असला तरी मूल ते चंद्रपूर हा महत्त्वाचा टप्पा गेल्या सात वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित होता. या मार्गावरील मोठमोठे खड्डे आणि अंधारामुळे वारंवार अपघात घडत असून, गेल्या चार वर्षांत या महामार्गावर झालेल्या अपघातांत तब्बल ९० निरपराध नागरिकांचा जीव गेला तर ४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी सातत्याने सरकारकडे मागणी लावून धरली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, १ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस मूल येथे आले असता, शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने पुन्हा एकदा मागणी सादर केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाला हिरवा कंदील दाखवत रस्ते विकास महामंडळाला आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्यास सांगितले आहे.
मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने शोभाताई फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.
👉 या निर्णयामुळे केवळ अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही, तर या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading