दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
रणसिंग फुंकले विकासाचे!
संपूर्ण नांदगाव गाव विकासाच्या शिखरावर नेऊ – माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर
नांदगाव | प्रतिनिधी
जिवनदास गेडाम (संपादक)
मुल तालुक्यातील नांदगाव हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी चर्चेत असून, राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जाते. मात्र दुर्दैवाने या संवेदनशीलतेचा फटका थेट सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत असून, गावाच्या मूलभूत विकास प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या तब्बल 11 महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना पूर्णतः ठप्प असून, या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असताना पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ग्रामस्थांच्या दृष्टीने जीवनावश्यक असलेला पाणीपुरवठा प्रश्न बाजूला सारत, ग्रामपंचायत अंतर्गत राजकीय कुरघोडी व अंतर्गत वाद यांनाच प्राधान्य दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.
या पार्श्वभूमीवर गावात नवीन देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा विषय अत्यंत वादग्रस्त ठरल्याने व ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेता, संवर्ग विकास अधिकारी (BDO) यांनी पुढील आदेशापर्यंत ग्रामसभा घेऊ नये, अशी स्पष्ट तंबी दिल्याने सदर ग्रामसभा रद्द करण्यात आली. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “पाणी नाही पण दारू हवी?” असा रोष ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
एकीकडे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, तर दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप, पैसा व सत्तासंघर्ष यात गावाचा सर्वांगीण विकास पूर्णतः खुंटला आहे. जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारा, दाद मागणारा कोणी मायबाप उरला नाही, अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर चर्चा होते; मात्र प्रत्यक्ष कृती शून्य असल्याची खंत ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवते.
विकासासाठी नवा आशेचा किरण
या अंधारलेल्या पार्श्वभूमीवर आता नांदगावसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मा. विनोद अहिरकर यांनी नांदगावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत विनोद अहिरकर म्हणाले,
“नांदगाव हे माझ्यासाठी केवळ एक गाव नाही, तर संघर्ष, स्वाभिमान आणि विकासाची मोठी संधी आहे. ग्रामस्थांची स्वप्ने भंग पावली असतील, तर ती पुन्हा उभी करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सलोखा या सर्व बाबींमध्ये नांदगावला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी ठोस आराखडा तयार केला जाईल.”
विकासाचा ऐतिहासिक आराखडा
अहिरकर यांनी पुढे सांगितले की,
- बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनेचा तातडीने आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना
- गावातील अंतर्गत रस्ते, वीज, आरोग्य सुविधा मजबूत करणे
- युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास उपक्रम
- महिलांसाठी स्वयंसहायता गट व आर्थिक सबलीकरण
- ग्रामस्थांमध्ये विश्वास व एकोपा निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय संवाद
यावर विशेष भर दिला जाईल. विकास हा राजकारणापलीकडे असून, जनतेच्या सहभागातूनच खरा विकास साध्य होऊ शकतो, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
जनतेच्या अपेक्षा उंचावल्या
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांच्या या भूमिकेमुळे नांदगावच्या ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासाला आता गती मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र ही आशा प्रत्यक्ष कृतीत उतरते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नांदगावचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता, इतिहास घडवणारा ठरेल का?
हा प्रश्न येणाऱ्या काळात उत्तर देईल.




0 टिप्पण्या
Thanks for reading