Advertisement

नांदगावातील भीषण अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार दोन मृत्यू, एकाला मदत… दुसरीकडे मात्र अन्यायच अन्याय!

 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇


नांदगावातील भीषण अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार

दोन मृत्यू, एकाला मदत… दुसरीकडे मात्र अन्यायच अन्याय!**

नांदगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका निष्पाप पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने त्याच्या दोन चिमुकल्या मुली आणि पत्नीच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेनंतर नांदगाव परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली.

घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी खेडी–गोंडपिपरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले. परिस्थिती गंभीर होत चालल्याने पोलीस प्रशासन व संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून प्रत्यक्ष देण्यात येईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली होती.

परिस्थिती चिघळल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. अखेर काँग्रेस नेते विनोद अहिरकर आणि स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम विभागाने मृतकाच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. त्यानुसार तीन ते चार दिवसांनी विभागाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीच्या मॅनेजरने मृतकाच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष आर्थिक मदत सुपूर्द केली.

मात्र याच अपघातात ओम भूर्ना तालुक्यातील सुनिता मरस कोल्हे (वय 40 वर्षे) या महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती बाहेरगावची असल्याने तिच्या मृत्यूची जबाबदारी मात्र कोणत्याही विभागाने स्वीकारली नाही. एकाच अपघातात दोन जीव गेले, पण न्याय मात्र एकालाच — हा सरळसरळ दुजाभाव असल्याचा आरोप होत आहे.

याबाबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी ठाम भूमिका घेतली असून,
“ज्याप्रमाणे नांदगावातील मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे सुनिता मरस कोल्हे यांच्या कुटुंबीयांनाही तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघातास कारणीभूत असलेला रस्त्यावरील मोठा गड्डा व नाली तात्काळ दुरुस्त करण्याचे आश्वासन विभागाचे इंजिनिअर सुनील कुबडे यांनी दिले होते. मात्र घटना घडून अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

या निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून अनेक निष्पापांचे प्राण गेले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ही दुर्दैवी घटना 21 जानेवारी 2026 रोजी घडली होती.
जोपर्यंत सर्व मृतांच्या कुटुंबीयांना समान न्याय व मदत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

  • 👍

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या