संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ जनजागृती अभियान उत्साहात
जुनगाव (ता. पोंभुर्णा) येथे वैनगंगा नदी परिसरातील हनुमान मंदिर देवस्थान येथे ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ या जनजागृती अभियानांतर्गत एक प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम संत निरंकारी मिशन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात निरंकारी मिशनच्या स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पथक संचालनाने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्वच्छ पाणी, पर्यावरण संवर्धन आणि समाजातील सकारात्मक बदल यांचे महत्त्व अधोरेखित केले.
माजी सरपंच तथा पत्रकार जीवनदास गेडाम यांनी आपल्या भाषणात जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाने जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ग्रामीण भागात स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. “स्वच्छ जल – स्वच्छ मन” ही संकल्पना केवळ घोषवाक्य नसून जीवनशैली व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन खुशाल झोडगे महाराज यांच्या पावन कृपेने करण्यात आले होते. मंचावर माजी सरपंच राहुल भाऊ पाल, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुलचंद चुधरी, बोंडाळा बुजरूक चे सरपंच मुरलीधर पाटील चधरी, माजी सरपंच जीवनदास गेडाम, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील पाल, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी घनश्यामजी दयालवार, श्री कोमावार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला निरंकारी मिशनच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, बाल गोपाल तसेच पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात सामाजिक बांधिलकी, अध्यात्मिकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश घुमत होता.
या उपक्रमातून गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून जलसंवर्धन व स्वच्छता अभियानाला बळ मिळाले आहे. ग्रामस्थांनी अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.










0 टिप्पण्या
Thanks for reading