Advertisement

पोंभुर्णा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

चंद्रपूर, दि. 31 मार्च 2026 :
पोंभुर्णा तालुक्यात 30 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोबतच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

माजी पंचायत समिती उपसभापती विनोद मारोती देशमुख यांनी या नुकसानीबाबत निवेदन सादर केले असून, त्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन शेतपिकांचे पंचनामे पूर्ण करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

(प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या