Advertisement

इरई नदी संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात; रहमत नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी दिल्या तातडीच्या सूचना रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत उभारली जाणार संरक्षक भिंत; आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

 

इरई नदी संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात; रहमत नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी दिल्या तातडीच्या सूचना

रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत उभारली जाणार संरक्षक भिंत; आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर | दि. २५ मे

चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या संरक्षणासाठी आणि नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदार तथा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री Sudhir Mungantiwar यांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत पहिल्या टप्प्यात मजबूत संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेत आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश दिले.

इरई नदीच्या काठावरील वाढते क्षरण, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ही पाहणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी नदीकाठ संरक्षित करण्यासोबतच दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पाहणीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रस्तावित भिंतीचा मार्ग, कामाची व्याप्ती, तांत्रिक बाबी आणि आवश्यक साहित्य याबाबत अभियंत्यांसोबत सखोल चर्चा करून नियोजन अंतिम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय नदीच्या सकल भागामध्ये माती भरण्याचे काम तसेच सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात यावे, असे सांगत या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही आ. मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे रहमत नगर परिसरातील नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पाहणीवेळी महापौर संगीताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वीताई गिरे, नगरसेवक रवी लोणकर, प्रज्वलंत कडू, अजहर शेख, राहुल पावडे, राजीव गोलीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, चांद सय्यद, ब्रिजभूषण पाझारे, सुरज पेदुलवार तसेच रहमत नगर परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत असून, नागरिकांची सुरक्षितता, शहराच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे. शहर विकासाच्या प्रत्येक विषयाकडे ते केवळ प्रशासकीय काम म्हणून नव्हे, तर चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून पाहत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या