Advertisement

पोंभुर्णा तालुक्यातील ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका तात्काळ खरेदी करा; अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बैलबंडी मोर्चा — विनोद अहिरकर यांचा इशारा

 



पोंभुर्णा तालुक्यातील ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका तात्काळ खरेदी करा; अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बैलबंडी मोर्चा — विनोद अहिरकर यांचा इशारा

पोंभुर्णा प्रतिनिधी | वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क

पोंभुर्णा तालुक्यात यावर्षी मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना शासकीय खरेदी प्रक्रियेमधील मर्यादित मंजुरीमुळे हजारो शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तालुक्यातील ऑनलाइन नोंदणी पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तात्काळ खरेदी करण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीवर भव्य बैलबंडी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस नेते विनोद अहिरकर यांनी दिला आहे.

अहिरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोंभुर्णा तालुका हा कृषिप्रधान तालुका असून यंदा अनुकूल वातावरणामुळे मक्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. तालुक्यात सुमारे ३० ते ३५ हजार क्विंटल मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला केवळ ५ हजार क्विंटल मका खरेदीची मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

त्यांनी सवाल उपस्थित केला की, “जर शासनाने मर्यादित खरेदीच करायची असेल तर उर्वरित हजारो क्विंटल मका शेतकऱ्यांनी कुठे विकायचा? खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.”

अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रत्यक्ष खरेदीला वेग नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. गोदामांची कमतरता, वाहतूक खर्च, तसेच वाढते तापमान यामुळे साठवणूक करणे कठीण होत असल्याची परिस्थिती आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संबंधित प्रशासनाने तातडीने अतिरिक्त खरेदी मंजुरी मिळवून सर्व ऑनलाइन शेतकऱ्यांचा मका खरेदी करावा, अशी मागणीही अहिरकर यांनी केली आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैलबंडी मोर्चा काढण्यात येईल व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

तालुक्यातील शेतकरी सध्या शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या