प्राणहिता वन्यजीव अभयारण्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
देवलमारी/सिरोंचा प्रतिनिधी : मनोज गेडाम
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागांतर्गत प्राणहिता वन्यजीव अभयारण्यात ५ जून रोजी "जागतिक पर्यावरण दिन" मोठ्या उत्साहात व जनसहभागातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र प्राणहिता, ग्राम परिस्थितीकीय विकास समिती (EDC) देवलमारी व रेपणपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वनकर्मचाऱ्यांच्या परेडने करण्यात आली. त्यानंतर देवलमारी गावातून प्रमुख रस्त्यांवरून भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी, महिला, पुरुष, ग्रामस्थ आणि वनकर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वृक्षदिंडीदरम्यान "झाडे लावा, झाडे जगवा", "पर्यावरणाचे रक्षण करा", "वन्यजीवांचे संरक्षण करा", "अवैध वृक्षतोड थांबवा", "एक झाड माँ के नाम" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या माध्यमातून पर्यावरणाबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमांतर्गत देवलमारी गावात ४०० तर रेपणपल्ली गावात ३०० अशा एकूण ७०० फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला दोन फळरोपे देऊन त्यांची लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. रोपांची योग्य निगा राखून ती मोठी झाडे झाल्यास भविष्यात फळांचे उत्पादन मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच आणि वनाधिकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढते तापमान, जंगलांची घटती व्याप्ती आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला देवलमारी ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे सदस्य, महिला-पुरुष ग्रामस्थ, विद्यार्थी, वनकर्मचारी व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन व वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करणारा ठरला.






0 टिप्पण्या
Thanks for reading