Advertisement

मुलमध्ये भरदिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, नागपूरला रेफर

 


मुलमध्ये भरदिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, नागपूरला रेफर

लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मुल, दि. १० जून (मुल तालुका प्रतिनिधी | वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क)

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाहरूख उर्फ मारोती नारायण मेश्राम (रा. मुल) या तरुणावर अज्ञात आरोपीने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने शाहरूख यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि नातेवाईकांच्या तत्परतेमुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील विशेष रुग्णालयात रेफर केले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

१२ ते १५ वर्षांपासून मुलमध्ये वास्तव्यास

शाहरूख उर्फ मारोती मेश्राम हे मूळचे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील रहिवासी असून गेल्या १२ ते १५ वर्षांपासून मुल शहरात वास्तव्यास आहेत. ते येथील शासकीय गोदामात काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांची ओळख होती.

हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट

सदर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा अन्य कोणते कारण याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुल शहरात भरदिवसा घडलेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संबंधित आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या प्रकरणातील अधिकृत पोलीस माहिती आणि पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तपासातील नवीन माहिती उपलब्ध होताच वाचकांना अद्ययावत वृत्त दिले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या