दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
"नराधमाला फाशी द्या!" संतप्त महिलांच्या आक्रोशाने चामोर्शी नगरी दणाणली
७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांचा विराट मोर्चा; हत्ती गेट ते पोलीस स्टेशन परिसर घोषणांनी दुमदुमला
चामोर्शी, दि. ११ जून | प्रतिनिधी
चामोर्शी तालुक्यातील एका ७ वर्षीय निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून संतप्त नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ चामोर्शी शहरातील महिलांनी बुधवारी हत्ती गेट ते चामोर्शी पोलीस स्टेशनपर्यंत विराट मोर्चा काढत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. "नराधमाला फाशी द्या", "लेकींच्या सुरक्षेची हमी द्या" अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
रंगकामाच्या निमित्ताने घरात प्रवेश, एकांत साधून घृणास्पद कृत्य
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या घरात रंगकाम सुरू होते. याच कामासाठी आलेल्या प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५) याने घराच्या गच्चीवर खेळत असलेल्या चिमुरडीला एकांतात गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरातील सदस्य इतर कामात व्यस्त असल्याची संधी साधून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी
घटनेनंतर बालिकेला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तातडीने तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडितेच्या आईने चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी गजाआड
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चामोर्शी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी प्रज्वल उर्फ नारू भांडेकर याला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६४(१), ६५(२) तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत.
महिलांचा संताप अनावर
घटनेच्या निषेधार्थ शहरातील विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हत्ती गेटपासून पोलीस स्टेशनपर्यंत निघालेल्या मोर्चामध्ये महिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या धक्कादायक घटनेमुळे चामोर्शी परिसरात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईबरोबरच जनजागृती आणि सतर्कतेची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. :::
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
"जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास"




0 टिप्पण्या
Thanks for reading