Advertisement

नगर पंचायतीच्या कर निर्धारण अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपी अटकेत, तीन जण फरार अहेरीत खळबळजनक घटना; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपासाला वेग

नगर पंचायतीच्या कर निर्धारण अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपी अटकेत, तीन जण फरार

अहेरीत खळबळजनक घटना; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपासाला वेग

अहेरी | दरारा 24 तास न्यूज लाईव्ह नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे नगर पंचायतीच्या कर निर्धारण अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अहेरी नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर अब्बनपल्ली फाट्याजवळ काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी अहेरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पांढरे हे नियमितप्रमाणे सकाळच्या वेळी अब्बनपल्ली फाट्याजवळ फिरण्यासाठी (वॉकिंग) गेले असता काही जणांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अहेरी शहरासह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अहेरी पोलीस ठाण्यात डॉ. अजय कंकडालवार, पिंटू मडावी, अजय नैताम आणि अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी डॉ. अजय कंकडालवार याला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद

अहेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS-2023) अंतर्गत आरोपींविरुद्ध खालील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

  • कलम 109(1) – जिवे मारण्याचा प्रयत्न
  • कलम 115(2) – स्वेच्छेने गंभीर दुखापत पोहोचवणे
  • कलम 352 – शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे
  • कलम 351(2) – गुन्हेगारी धाक दाखवणे
  • कलम 3(5) – सामूहिक उद्देशाने गुन्हा करणे

तपासाला वेग

घटना संवेदनशील स्वरूपाची असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपी आणि पीडित यांच्यातील पूर्वीचे संबंध तसेच हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

– दरारा 24 तास न्यूज लाईव्ह नेटवर्क


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या